Be Positive???

 Being Positive...


Hello, कोरोना काही थांबायचं नावच घेईना.. ऑक्सिजन विना माणसाचा मृत्यू होतोय.. काय भयानक गोष्ट आहे.. जगात एकमेव गोष्ट आहे जी विनामूल्य उपलब्ध आहे आणि त्याच्यासाठीच आता ह्या आजाराने पैसे मोजायला भाग पडलंय म्हणजे बघा... अक्षरशः जीव कासावीस होऊन प्राण गमावतायत लोकं... खरंच अंगावर काटा येण्यासारखी परिस्थिती आहे... तरीही एक पॉझिटिव्हिटी ठेवायची असं म्हणणं आहे... 




पॉझिटिव्हिटी ठेवायची म्हणजे नेमकं करायचं तरी काय आपल्या घरी कोणाला कोरोना झाला नाही म्हणून आनंद मानायचा आणि आयपीएल लावणार; एवढ्यात समजतं की शेजारचं कोणीतरी एकदम यंग धडधाकट आपल्या मागे बायको आणि दोन छोटी मुलं ठेवून देवाघरी गेलं... तरी आपण पॉझिटिव्ह राहायचं... कोरोना असला तरी माणसाला जगण्यासाठी सगळ्या त्याच गोष्टी लागतात हो... आणि त्या सगळ्या गोष्टींना पैसा लागतो... मुलांच्या शाळा सुरू नसल्या तरी फी मात्र सुरू आहे.. मुलांच्या फी वरचे शून्य वाढतंच जातायत हो... आणि पगारावरचे शून्य कोरोनामुळे कमी होतायत... रादर काहींना तो पगारही मिळत नाहीये... पगार नाही तर नाही किमान नोकरी तरी आहे ह्या आशेवर लोकं जगतायंत.... सरकारचा हा समज झालाय की सगळेच वर्क फ्रॉम होम करतायंत.... जे करत नाहीयेत ते सगळे अत्यावश्यक सेवेत मोडतात.... अहो पण ज्यांचा व्यवसाय आहे ऑफिस किंवा इतर कुठे फिजिकल वर्क आहे त्यांचं काय??? यावर मीडिया काहीच कसं बोलत नाही??? ज्यांच्याकडे नोकरी नाहीये, पैसे नाहीयेत त्यांनी कसं बरं पॉझिटिव्ह राहायचं?? कमावलेला पैसा वर्षभर पुरला पुढे काय?? सगळ्या व्यावसायिकांच पोट एकमेकांवर अवलंबून आहे हे मान्यच नाहीये सरकारला फूल वाल्याने, चप्पल वाल्याने, कपडे वाल्याने, आपल्या गोष्टी विकल्या नाहीत तर तो भाजी, दुध, औषधं, कशी घेणार??? बरं सगळे नियम पाळले काय किंवा नाही पाळले काय कोरोनाचे पेशंट तेवढेच... अख्खं वर्ष घरातून बाहेर न पडलेल्यांना सुद्धा कोरोना होतोय, अशा परिस्थितीत पॉझिटिव्ह कसं काय राहायचं?? लोकांना भिकेला लागायची वेळ आली आहे तरीही Lockdown मात्र संपत नाहीये... आता सगळं नीट होईल, मग सगळं नीट होईल असं अजुन किती दिवस पॉझिटिव्ह विचार करायचा??? बरं असा विचार करून बदल मात्र काहीही होत नाहीये... कोरोनाच्या ट्रीटमेंटचंच बघाना.. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना पटापटा बेड मिळतोय.. ऑक्सीजन मिळतोय.. आणि ज्यांच्याकडे नाही ते बिचारे मरतायत.... मीडिया, डॉक्टर्स, पोलीस, आणि सो-कॉल्ड अत्यावश्यक सेवा वाले खुप काम करतायंत अगदी आपली जीवाची बाजी लावून.... अहो पण कोणी फुकट करत नाहीये हो... सगळ्यांना त्याचा मोबदला मिळतोय.... ज्याने त्याने आपल्या मर्जीने हे काम स्वीकारलय... 


आपल्या फॅमिली साठी पैसे कमावणं.. आपल्या मुलांच्या शाळा सुरू राहाव्यात यासाठी शाळेची फी भरणं...ही एका सामान्य माणसाची अत्यावश्यक गरज नाहीये का?? त्याचं जर वर्क फ्रॉम होम नसेल तर तो ह्या सगळ्यासाठी पैसा कुठून आणि कसा आणणार??? कधी तरी विचार करा... 

जे सुखवस्तू आहेत त्यांना म्हणणं खूप सोप्प आहे हो... "पॉझिटिव्ह विचार करा" याच सुखवस्तू लोकांनी कधीतरी निगेटिव्ह विचार करा ना.... आपल्याकडचा पैसा अचानक संपला तर खाणार काय, मुलांना शिकवणार कसं, कोरोना झाला तर पैसे कुठून आणणार??? एका सेकंदासाठी का होईना भीती वाटली असेल कदाचित... म्हणायला खूप सोप आहे पॉझिटिव्ह विचार करा पण.... 

ज्याचं जळतं त्यालाच कळतं हो...🙏🙏


©अनिरुद्ध रानडे

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट