DONATE FOOD - अन्नदान हेच श्रेष्ठदान

 नमस्कार,😇🙋


आज बर्‍याच दिवसांनी लिहिण्याचा योग आलाय... सोशल मीडियाला पावसाळी सुट्टीच दिली होती मी.. मला वाटतं मधूनच असं सगळ्यांनी करायला हवं.. किती आहारी गेलोय नाही आपण या सगळ्याच्या.. आपल्या आयुष्यात काय चाललंय या आधी दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय याची सगळी खबर आपल्याला एका क्लिक वर मिळते😅 ह्याचे फायदे तसे बरेच आहेत.. एक तर आपण एकमेकांच्या सतत संपर्कात राहतो, बर्‍याच नवीन गोष्टी आपल्याला कळतात, नवीन लोकांच्या ओळखी होतात, भरपूर आणि नवीन शिकायला मिळतं, काही जुन्या आठवणी ताज्या होतात.. एकच तोटा तो म्हणजे याचं व्यसन लागतं, मग काही दिवस ह्या सगळ्या पासून दूर राहावं म्हंटलं.. पण हे इतकं सोप आहे कुठे.. फोन पाहायचाचं नाही मग करायचं काय? हा प्रश्न.. टिव्ही किती वेळ बघणार त्याचाही कंटाळा येतो.. विचार केला लिखाण जमतं ते करु म्हणून वेगवेगळे विषय लिहायला घेतले पण लेखकाचं कसं असतं माहितीये का; आपण लिहिलेलं जोपर्यंत कोणी वाचत नाही ना तोपर्यंत त्याचं समाधान होत नाही.. I Mean मला तरी असं वाटतं सहाजिकच आहे आणि मला माझ्या प्रश्नाचं सोल्यूशन मिळालं☺️ आपण वाचायला हवं... खरंच वाचनात थोडक्यात ज्ञानात भयंकर ताकत आहे म्हणूनच ज्ञानाचं दान करणारे देवांच्या जागी असतात मग ते शिक्षक असोत, आई-वडील असोत वा इतर कोणी कारण ज्याच्याकडे सुसंस्कार नाहीत त्याकडे इतर दानधर्म करण्याची 'दानत' येणार कुठून.. असो आपण आपलं जेवणपुरतं बोलू, नाही का?? 


अन्नदानाचा विषय निघाला की एक विचित्र गोष्ट आठवते सगळ्यांच्या माहितीचीच आहे अन्नदाना मुळेच रामायणाचा महत्त्वाचा भाग घडला म्हणायला हरकत नाही... नाही का? बघा ना; रावण भिक्षा मागायला सीतेच्या दारात आला आणि अन्नदान नाकारायचं कसं😢 म्हणून लक्ष्मणरेषा ओलांडली आणि सीतेचे हरण झाले... महत्त्वाचं म्हणजे इतकं रामायण घडूनही अन्नदान काही थांबलेलं नाही; कारण जग इकडचं तिकडे झालं तरी माणसाच्या मूलभूत गरजा बदलणार आहेत का?? अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा भागविण्यासाठी माणसाचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत... त्यातही एखादा कपडा नसला तरी फार फरक पडत नाही.. डोक्यावर छप्पर नसेल तरी हरकत नाही.. वाढत्या लोकसंख्येने भारताची अवस्था कशी झाली आहे हे नव्याने सांगण्याची काय गरज.. देव धर्मासाठी आपण बरेचदा अन्नदान करतो पण मला असं वाटतं "निरपेक्ष भावाने दान करायला मग ते कोणत्याही स्वरूपाचे असो दानत लागते" मी असं म्हणतोय कारण काही लोक माफक दरात जेवण उपलब्ध करून देतात.. बऱ्याच जणांची तेवढी ही क्षमता नसते हो.. गैरसमज असा की स्वतःला लॉस मध्ये जाऊन आपण खाऊ घालतोय म्हणजे पुंण्याचं काम तर तसं अजिबात नाही हं.. हा ही हल्ली एक बिजनेस झालाय, आधी किमती कमी ठेवायच्या थोडी प्रसिद्धी मिळाली की मग किमती वाढवायच्या असेही काही महाभाग असतात.. याला अपवादही आहेत बरं का.. काही लोकं समोरच्याचा स्वाभिमान जपण्यासाठी जेवणाचे क्षुल्लक पैसे आकारतात जेणेकरून; नाईलाज असलेली मंडळी awkward feel करू नयेत.. 


भीक मागणाऱ्याचा हात सुद्धा एक वेळ तुमच्या पुढे हात पसरण्यात आणि एक वेळ तोंडाकडेच जातो... "आपल्याकडून एखाद्याला एक वेळचं पोटभरीच जेवण जेऊ घालणे हे खरं अन्नदान म्हणता येईल".. मला हा सुद्धा मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो, बहुतेकांनी अनुभव घेतला असेल.. भीक मागणाऱ्याला पैसे दिले की; तो जाऊन काही खाईलच याची शाश्वती नसते.. कदाचित पैशांचा उपयोग दुसऱ्या कशासाठी सुद्धा तो करू शकेल अशी भीती.. किमान एक वेळ जेवणा एवढे पैसे तरी त्याच्याकडे जमायला हवेत.. जर पटकन जाऊन जेवता येईल इतके त्याच्याकडे पैसे जमले नाहीत तर, तो तरी काय करणार बिचारा... आपण आपल्या खिशाला परवडेल तितकीच मदत करू शकतो अगदीच मान्य.. पण त्या भिकाऱ्याची भूक भागत नाही ना.. अगदी एखादा बिस्कीटपुडा किंवा वडापाव दिलात तर तो कसा काय पोटभरीचा होणार?? 

"आपण फक्त दान करावं बाकी देव त्याला सुबुद्धी देईलच."


ह्यावरून एक प्रसंग आठवला मागे एक काका भेटले होते.. ते एक ट्रेकर होते.. त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलं होतं की, ट्रेकिंग दरम्यान पाणी आणि जेवण मिळणं म्हणजे भयंकर मुश्किल.. मैलोन् मैल एक साधी टपरी सुद्धा नसते पण अशा वेळी जंगलात राहणारे आदिवासी मंडळी फार उदार असतात.. त्यांच्याकडे शिजलेलं ते किती आपुलकीने वाढतात... हे खरं अन्नदान... नाही तर आमच्या हॉटेलमध्ये येणारे; भरमसाठ जेवण मागवतात.. सगळं उष्टंवतात.. आवडलं नाही म्हणून फेकून देतात.. कोणाला देताही येत नाही हो ते.. बरं, स्वतःही घरी घेऊन जात नाहीत... भारताची परिस्थिती अशी आहे ते उष्टं अन्न खाणारी लोकं सुद्धा मी बघितली आहेत... मी मागे एकदा रेस्टॉरंट फूड मॅनेजमेंट वर लेख लिहिला होता.. आम्ही आमच्याकडे उरलेलं अन्न अनाथाश्रमात किंवा गरजू लोकांना दान करतो...

लहानपणापासून सगळ्यांना हेच शिकवलं जातं.. जितकी भूक आहे तितकाच पानात वाढून घे.. टाकू नकोस घेतलेलं संपव.. वय वाढतं तसं सगळं विसरतो आपण.. बकासुरा सारखं वाढून घ्यायचं आणि लहान बाळागत एवढंस खाऊन टाकून उठायचं.. आपल्याला एका पोळीची भूक नसली तर अर्धी पोळी दुसऱ्याच्या वाट्याला ठेवायची ज्याने त्याची भूक शमेल हेच तर खरं अन्नदान.. थोडक्यात 

"अन्नदान म्हणजे जो करेल त्याला केलेल्याचं आणि जेवणाऱ्याला तृप्तीचं समाधान."

©Chef Aniruddha Ranade

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट