TADAKA - फोडणी
Hello🙋
काय तुफान गरम होत होतं नाही यावर्षी... ह्या अचानक आलेल्या वादळी पावसाने नुकसान बरंच झालंय पण उष्णता मात्र थोडी कमी झालीये... या गरमीने माणसाचा जीव जातोय हा कोरोना कसा मरत नाही देव जाणे... हळूहळू पावसाला सुरुवात होईल यावेळी आंब्याच्या रेसिपी चे तूफान प्रकार दिसले... आता पावसाळी आंबे सुरू होतील त्याची चव काही निराळीच असते.. आंब्याचा थाटच वेगळा असतो नाई.. एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे आपण याची वाट बघत असतो.. पण आजकाल आंब्याचे भाव सुद्धा परवडण्यासारखे राहिलेले नाहीत.. हो, त्यामागे नक्कीच Genuine कारणं असतील पण हल्ली आंबा खाण्यावर बंधन आल्या सारख वाटतं... अख्ख्या सिझनमध्ये चार ते पाच डझन आंबे आणले जातात... या दोन वर्षाच सोडून देऊ पण एकंदरीत नातेवाईकांच, बहीण-भावांच एकमेकांकडे येणं-जाणं कमी झालय... काही कारण असल्याशिवाय कोणी कोणाकडे जातंच नाहीत हल्ली... पूर्वी बहीण-भावंड सुट्टीत एकमेकांकडे राहायला जायचे.. त्यावेळी चार पाच डझन आंबे तर एकाच वेळी आणले जायचे.. आठवते का ती लाकडाची उंच पेटी.. आता क्वचित कोणाच्या घरी पाहायला मिळतात... कोरोनाने आपल्याला सगळ्या जुन्या गोष्टींबद्दल विचार करायला लावलं यावर सुद्धा विचार करायला हवा... आता आपण तर मोठे झालो पण आपल्या मुलांना तरी नाती जोडायला शिकवायला हवं हो ना???
बघा कसा विषय बदलत जातो.. एक मात्र खरं की नेहमी माझे विषय तुम्हाला पटतात आवडतात फक्त ते तुम्ही जमेल तसे जमतील तितके फॉलो सुद्धा करा.. मी सांगतो म्हणून अजिबात नाही बरं का.. तुम्हाला मनापासून पटले तरंच... काय मग घ्यायचा का नवीन विषय... काही दिवस मी फेसबुक वर नव्हतो.. कितीतरी जणांचे मला मेसेज आले.. इतकं छान वाटलं.. फक्त लेखांमधून मी इतकं छान बॉण्डिंग करू शकलो... सगळी सुखं पैशांनी विकत घेता येत नाहीत हे त्यातलंच एक सुख..Food आणि नाती यांचा डायरेक्ट संबंध असतो बरं का... जेवणात कशा गोड, कडू, कधी आंबट, तिखट चवी असतात तशाच त्या नात्यांमधल्या आठवणींमध्ये सुद्धा असतात... जेवणात सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो आणि नात्यांमध्ये सुद्धा असतोच..
तो म्हणजे तडका "फोडणी"... Yes हाच आहे आपला आजचा विषय...
☺गम्मत वाटते ना..विषय तसे अगदी नेहमीचे असतात; विचार आणि अभ्यास केला तर त्यातही किती गोष्टी दडलेल्या असतात.. 'तडका' म्हंटलं की आधी डाल आठवते असं काहीतरी क्षुल्लक काम असल्यागत आपण म्हणतो, आमटीच करायची आहे ना.. कुठे मोठी ओझी उचलायचीयेत... वरणाला नुसती फोडणी तर द्यायचीये... एवढं कमी महत्त्व देतो आपण... आमटी, भाजीला किंवा अगदी कोशिंबिरीला, साराला ह्याच तडक्याने/ फोडणी ने खरी खमंग चव येते.. फोडणी विना पदार्थ अर्थहीनच म्हणावे लागतील...
कित्येक जणांना फोडणी कशी करायची हे नीटसं माहीतही नसतं.... अनेकांच्या फोडणीत मोहरी कच्ची असते, ती फार वाईट लागते... शिवाय प्रत्येक फोडणीचं गणित वेगळं असतं... काही फोडण्यांमध्ये मोहरी जास्त घालायची असते तर काही फोडण्यांमध्ये नावापुरतीच... हे गणित जमलं नाही तर फोडणी गडबडलीच म्हणून समजा.... कधीकधी काही लोकं फोडणीत मोहरी, जिरं, लसूण, मिरच्या, कढीपत्ता यांचा इतका मारा करतात की तोंडाची चव जाते इतका पाचोळा तोंडात येत राहातो....
तेलाच्या साध्या फोडणीचं प्रमाण काय तर ३/४ पळी तेल, १/४ चमचा मोहरी, चिमुटभर हिंग, १/४ चमचा हळद..
आता ती करायची कशी तर... गॅस वर लोखंडी पळी तापत ठेवायची..या भांड्याला बरीच जणं "कढलं" असंही म्हणतात... त्यात तेल घालायच.. तेलावर वाफ दिसायला लागली की आधी थोडीशी मोहरी घालायची.. ती जर तडतडली नाही तर थोडं थांबून तेल आणखी तापू द्यायच.. नंतर उरलेली मोहरी घालायची... मोहरी तडतडायची थांबल्यानंतर एक, दहा-बारा अंक मोजेपर्यंत तशीच गॅस वर राहू द्यायची म्हणजे फोडणी कच्ची राहण्याची भीती नसते... नंतर त्यात हिंग आणि सगळ्यात शेवटी हळद घालायची म्हणजे हळद करपत नाही... ही झाली बेसिक फोडणी...😁 आता परफेक्शन साठी काय करता येईल फोडणीचं तेल नीट तापलेलं नसेल तर पदार्थाला तेलाचा वास येतो.. फोडणी गॅस वर असताना त्यात हळद घालायची... घातलीच तर ती करपते आणि फोडणीचा अरोमा आणि टेस्ट बदलते... फोडणीत मिरच्यांचे तुकडे, चिरलेला कांदा, लसूण, असे पदार्थ घालायचे असतील तर ते मोहरी तडतडायची थांबल्यावर घालायचे... हे पदार्थ थोडे तांबुस रंगाचे झाले की मग हिंग घालायचा... फोडणीत लाल तिखट घालायचे असेल तर ते हळदी बरोबरच घालावं... फोडणी गॅस वर असताना त्यात लाल तिखट घातलं तर ते करपत आणि त्याच्या ठसका घशात जातो... कांदा, लसूण, कढीपत्ता, हिंग, या वासाच्या पदार्थांपैकी आवडीप्रमाणे एखादाच वापरा... तेल जरी जास्त असलं तरी मिसळणाचं प्रमाण वाढवावं लागत नाही ते तेवढेच ठेवायचं... पदार्थाला फोडणी दिल्यावर तो ढवळून त्यावर लगेच झाकण ठेवायचं म्हणजे फोडणीची टेस्ट पदार्थात मुरते..
आता तुपाच्या फोडणी कडे वळूया... तुपाची फोडणी तेलाच्या फोडणी पेक्षा नाजूक असते म्हणून तुपाची फोडणी तेलाच्या फोडणी पेक्षा मंद आचेवर करावी.. कारण तूप प्रमाणापेक्षा जास्त तापलं तर फोडणीला घाण वास येतो आणि पदार्थ खाववत नाही... उपवासाच्या पदार्थांसाठी तुपाची फोडणी करायची झाली तर त्यात जिरे आणि इतर पदार्थांसाठी करायची असेल तर थोडी मोहरी, हिंग आणि हळद.... आता खूप महत्त्वाचं फोडणी तयार झाली की त्यात थोडं मीठ घालावं मीठ घातल्यामुळे पदार्थ थंड झाल्यावर बरेचदा वर तूप तरंगताना दिसतं.. मीठ घातल्याने ते होत नाही....
आता कोणी नवखं असेल तर Accidents होण्याची शक्यता नाकारता येत नाही ना त्यासाठी काय काळजी घ्यायची??? गॅस वर ठेवलेली पळी ओली असेल तर त्यात तेल घालायच नाही.. तसं केलं तर तेल तडतडून फोडणी आजूबाजूला उडते/पसरते... पळी खूप जास्त सुद्धा तापू द्यायची नाही कारण त्यात तेल घातलं की ते करपत आणि पेट सुद्धा घेऊ शकत.. भांड्यापेक्षा आच मोठी असेल तर तेलाला आग लागू शकते... फोडणी गॅसवर ठेवून मध्येच टीव्ही बघायला किंवा फोनवर बोलायला जाऊ नका😉 तिच्याकडेच लक्ष ठेवा नाहीतर ती अधिक तापून पेटेल... जास्त वापरलेलं किंवा खराब तेल असेल आणि ते तापायच्या आधीच त्यात मोहरी घातली तर ते फेसाळत आणि उतू जातं... फोडणीमध्ये ओल्या मिरच्या, चिरलेला कांदा, लसणीच्या पाकळ्या किंवा कोणताही ओला पदार्थ घालायचा असेल तर फोडणी कढईतच करावी कारण या पदार्थांनी फोडणीला फेस येतो.. फोडणीत ओल्या मिरच्यांचे तुकडे घातले तर कढई वर पटकन झाकण धरावं कारण मिरच्यांचे तुकडे तडकन फुटून उंच उडतात आणि ते डोळ्यात जाण्याची शक्यता असते.. अगदी पळीतच ओले पदार्थ घालून फोडणी करायची असेल तर पळी गॅसवरून बाजूला करून खाली एखाद ताट ठेवायच आणि त्यात एकेक पदार्थ हळूहळू घालायचा म्हणजे तो उतू जाणार नाही... काहीजण कोशिंबीर, कढी, भरीत अशा गोष्टी केल्या असतील तर त्यावर ऐनवेळी फोडण्या घालतात... कारण त्या फोडण्या खमंग, खुसखुशीत राहातात... कोणी करत नसाल तर करून बघा...
काय मग रमलात ना फोडणीत..😁😁
लेख आवडला तर नक्की सांगा..
©Chef Aniruddha Ranade
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा