घरी बनवला जाणारा तो SPECIAL पदार्थ

 Hello, Welcome Back 🙋🏻‍♂️🙏🏻

कसे आहात सगळे?? पाऊस काय म्हणतोय?? आपल्याकडे प्रत्येक ऋतूमध्ये विशेष पदार्थ आहेत ना, बघा ना उन्हाळा म्हटलं की आंबा, कैरी, पन्हं.. पावसाळा म्हंटला की कांदा भजी, मक्याचं कोळशावर भाजलेलं कणीस... श्रावणात आणखी बरेच पदार्थ होतात पण श्रावण येईपर्यंत प्रत्येकाच्या घरी एकदा तरी कांदा भजी झालेली असते... हिवाळा अन दिवाळी ठरलेली त्यामुळे हिवाळ्यात फराळ हल्ली डिसेंबर मध्ये लोकं प्लम केक, चॉकलेट्स पण करायला लागलीयेत... माणूस आपल्यापरीने चांगले चुंगले पदार्थ बनवण्याचे फक्त बहाणे शोधत असतो असं मला वाटतं हाहाहा!!! ऋतू कमी म्हणून सण... सण कमी पडले म्हणून Special Occasion.. मारुतीच्या शेपटासारखा वाढतंच जातंय... अजून एक कनेक्शन आहे ते म्हणजे आठवणींच... फूड म्हटलं की आठवणी आल्याच.. तुम्ही आला होता तेव्हा आपण हे केलं होतं.. तिकडे गेलेलो तेव्हा आपण ते खाल्लेलं.. मागच्या पावसाळ्यात आपण कॉर्न पॅटीस केलेली.. यावर्षी सुद्धा व्हायलाच हवीत... एक न दोन शंभर आठवणी असतात... आपला आजचा विषय सुद्धा याच आठवणींमध्ये दडलाय... तुम्ही लेख वाचलात की तुम्हाला सुद्धा काहीतरी आठवेल आणि आठवलं तर नक्की शेअर करा...

तर आपला आजचा विषय आहे "घरी बनवला जाणारा तो स्पेशल पदार्थ" ज्यासाठी सगळे आतुरतेने थांबलेले असतात आणि हो तो पदार्थ कोणा एकाच्या हातचाच चांगला लागतो दुसऱ्या कोणी बनवलेला घरात कोणालाच चालत नाही...

आमच्या घरी असे बरेच पदार्थ आहेत पण आमच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे सुट्टीचा... अहो केलेलं खायला सगळी जणं घरी तर असायला हवीत ना.. दुसरी गोष्ट यातला एकही पदार्थ माझ्या हातचा नाही... नाई काही जणांना वाटलं असेल मी शेफ आहे माझ्याच हातचं खायचं असेल, तर तसं अजिबात नाही.. म्हणजे मी घरी पदार्थ बनवतो.. सगळे आवडीने खातात, पण surprisingly कोणता स्पेशल पदार्थ माझ्या नावावर अजून तरी नाही हाहाहा!!😋 एक तर आईच्या स्वयंपाकघरात एन्ट्री मिळतेय, ते मिळणंच कर्म कठीण काम... 

एखादा पदार्थ बनवताना तिच्या सूचना आजही सुरू असतात.. हे असं नको ठेवूस.. ते तिकडे ठेव.. हे धुऊन घे स्पेशली कोथिंबीर.. ते जागेवर जाऊ दे... काम झाल्यावर ओटा साफ करायचाय मी करणार नाहीये... पण बरेचदा काय होतं पदार्थांची टेस्ट दिल्यावर खूष होऊन तीच आवरते सगळं... असं सगळं असताना तिच्या नावावर असलेला स्पेशल पदार्थ बनवणे शक्यच नाही... खरं सांगू का, मला येत असला तरी मी बनवत नाही... नाहीतर आईच्या हातचं खाण्यातली मजा निघून जाईल... तुमचंही होतंच असेल असं... काही जणांच्या हातालाच वेगळी चव असते असं आपण म्हणतो ते काही खोटं नाही... आमच्या आईला कोणता पदार्थ येत नाही असं नाही... एखादा अगदीच नवीन असेल तर, ती रेसिपी शोधून काढून अगदी जशाचा तसा बनवते... बहुतेक तीच्या याच गुणामुळे मी शेफ झालो असेन कदाचीत... 

चला आता मेन मुद्द्याकडे वळूया तर आमच्याकडचा तो स्पेशल पदार्थ जो फक्त आईच करते तो म्हणजे "स्पेशल पाव भाजी"... 

आम्ही क्वचितच कधी पावभाजी बाहेरून आणली असेल किंवा बाहेर खाल्ली असेल... पावभाजी म्हटलं की आईच्या हातची बेस्ट असते... आता ती करायची म्हटलं की मगाशी म्हणालो तसं आधी प्रश्न सुट्टीचा सगळे घरी असायला हवेत किंवा किमान रात्रीच्या जेवणाला तरी असायला हवेत.. त्यामुळे या पावभाजीचं प्लॅनिंग, रविवारी करायची असेल तर गुरुवार पासूनच सुरू होतं... मग गुरुवारी सकाळी सुरू झालेली चर्चा रात्री संपते आणि रविवार ऐवजी सोमवारी सगळे घरी आहेत म्हणून सोमवार रात्रीचा बेत ठरतो...😅😅 हाहाहा!!! मग दोन-तीन दिवस सोमवारी पावभाजी करायची आहे याच्या उजळणीत जातो😂 रविवारी भाजी आणायची असते.. सोमवारी भाजी चिरताना हमखास कोथिंबीर किंवा लिंबू विसरलेलं असतं मग पुन्हा धावत पळत ते घेऊन यायचं... कधी कधी ऐनवेळी लक्षात येतं पावभाजीचा मसाला थोडाच आहे कमी पडणारे मग तो धावत पळत घेऊन यायचा... बाय द वे आम्ही हल्ली बादशहाचा पावभाजी मसाला वापरतो.. आधी एव्हरेस्ट चा वापरायचो तीन एक वर्षापासून बादशहाचा सुरू केलाय... पण आता पावभाजी बनवायची ठरली की आई म्हणाली की ती घरीच मसाला बनवणारे त्यामुळे ब्रँडेड मसाला वापरणं पुढच्या वेळेपासून बंद.... बऱ्याच जणांना प्रश्न पडतात म्हणून आधीच सांगून टाकलं☺️☺️ आता पाव बेकरी मधून कोणी आणायचे यावर एकदा चर्चा होते... फार उशीर झालाय पाव भाजायला नकोत तसेच खाऊ म्हणून त्यावर वाद... शेवटी मेजॉरिटी म्हणते अजून उशीर झाला तरी चालेल पण पाव भाजायचेच आणि At Last मस्त सुगंध दरवळणारी आमच्या आईची स्पेशल पाव भाजी पानात पडते आणि पहिल्या घासालाच "वाह क्या बात है"!!! आल्या वाचून राहत नाही... 

तर अशी होती आमच्या पावभाजीची छोटीशी गोष्ट... तुमची आहे का हो अशी एखादी गोष्ट नक्की सांगा... लवकरच भेटू एक नवीन विषय घेऊन... तब तक के लिए हेल्दी खाओ!! हेल्दी रहो!!

©✍🏻Chef Aniruddha Ranade 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट